लातूर जिल्हा

माणसातील माणूस वाचवण्याची किमया बसवण्णांनी केली – उत्तम कांबळे


लातूर :सध्याचे जग आणि आपण एका विलक्षण अशा अवस्थेतून जात आहोत. ही अवस्था म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवर पूर्वी माणसाला जेवढे शत्रू अस्तित्वात नव्हते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शत्रू आता निर्माण झालेले आहेत. जागतिकीकरणामध्ये, व्यावसायिकीकरणांमध्ये आणि खाजगीकरणांमध्ये मानवाचे शत्रू प्रचंड प्रमाणात निर्माण झालेले आहेत. यामुळे माणसे जगण्याची ठिकाणे कमी आणि मरण्याची ठिकाणे वाढली आहेत. माणूस विरुद्ध यंत्र माणूस विरुद्ध धर्म अशा संघर्षामध्ये अडकलेल्या माणसाला बाहेर काढून त्यातल्या माणसाचे संवर्धन करण्यासाठी खूप कमी मार्ग शिल्लक राहिले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे बसव विचाराचा मार्ग होय. असे विचार ज्येष्ठ संपादक साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांनी मांडले.

महात्मा बसवेश्वरांनी समाजातल्या निम्नस्तरातील लोकांवर लादलेली गुलामगिरी ही धार्मिक स्वरूपाची, जातीय स्वरूपाची, वंशिक स्वरूपाची, सामाजिक स्वरूपाची, प्रादेशिक स्वरूपाची, आणि स्त्री पुरुष भेद स्वरूपाची होती. ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी चार्वाक – भगवान महावीर – भगवान गौतम बुद्ध- आणि त्यांच्यानंतर महात्मा बसवेश्वर ही अत्यंत महत्त्वाची कडी होती. कारण यांनी माणसातला माणूस वाचवण्याची किमया घडून आणली. हजारो वर्षाच्या धार्मिक, वंशीक, रंग,वर्ण, प्रदेश, विचार, स्वर्ग नरकाच्या कल्पना मध्ये अडकलेल्या गुलामाला मुक्त करण्याची प्रेरणा, विचार बसवण्णाने दिला त्यामुळेच आजही त्यांचेच विचार हे अत्याधिक महत्त्वाचे ठरतात असेही त्यांनी सांगितले.
अज्ञानाच्या पिळवणुकीला वर्षानुवर्षे बळी पडलेला समाज, ब्राह्मणाने समाजात रूढ केलेली स्वर्ग- नरकाची संकल्पना आणि त्यात अडकलेला समाज हा श्रम करूनही आपल्या हक्काचं तो मिळू शकत नव्हता, त्यामुळे अज्ञानात अडकलेल्या, अंधकारमय जीवन जगणाऱ्या श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा देत, वेद- पुराण आणि धर्मग्रंथावर ज्यांनी कडाडून टीका करून श्रमिकांना आणि त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काय कवे कैलास चा संदेश देऊन श्रमाच्या प्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त केला आणि त्यातूनच त्याच्या मुक्तीचा मार्ग देखील प्रशस्त होत गेला असेही विचार त्यांनी यावेळी मांडले. या पृथ्वीवर जे जे निर्माण होते, जे जे जन्माला येते त्याचा मालक फक्त ब्राह्मण होता या संकल्पनेला देखील महात्मा बसवेश्वरांनी धक्का देत स्वकष्ट हाच खरा ईश्वर प्राप्तीचे मार्ग असल्याचा त्यांनी दाखवून दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तो आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे महाराष्ट्राच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत मात्र त्यानंतर कोणतीही मोठी घटना घडली नाही. महाराष्ट्राला लाभलेली शिक्षण परंपरा ही महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, संत गाडगे महाराज अशी असून शिक्षण संस्था या उद्याचा विचार करून उभारल्या जात असतात, मला वाटतं एखाद्या शिक्षण संस्थेची उंची ही ती शिक्षण संस्था चालवणाऱ्यांची नैतिकता आणि बौद्धिकतेशी आणि त्या संस्थेचे संबंधित कर्मचारी यांचे गुण आणि बौद्धिक उंचीवर अवलंबून असते असे विचार अध्यक्षिय समारोपप्रसंगी संस्थापक कुलगुरु तथा माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांनी मांडले.
जगातील सर्वाधिक धोके सध्या वाढीस लागले आहेत, जगातील मूलतत्त्ववादी विचाराचे धोके मानवी जीवनाच्या संदर्भात आहेत आणि माणसा विरोधातील अनेक युद्ध सुरू आहेत, मानवी जीवनाला वाचवायचा असेल, मारणाऱ्या माणसांना वाचविण्यासाठी महात्मा बसवेश्वरांचा विचार वाचवू शकतो असेही ते म्हणाले.
महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची अंमलबजावणी महात्मा बसेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थाचालकांनी करावी, असे केले तर काशी रामेश्वर करण्याची आवश्यकता उरणार नाही, विद्यार्थी केंद्रित शिक्षण देऊन गुणवत्तेची उंची वाढवावी, महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रामाणिक, सचोटीपूर्ण नैतिक अधिष्ठानावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करावी असे विचार माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात भारतातील समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणेसाठी ज्या गोष्टींचा अवलंब केला ते तत्त्वज्ञान अंगीकारला, त्या तत्त्वज्ञानाचा समावेश राज्यघटनेत केला, संस्थेने जनतेच्या गरजेच्या गोष्टींचा जरूर विचार केला पाहिजे, शिक्षणातून सदगुणी मनुष्यबळ निर्माण होणे अपेक्षित आहे,असे मत माजी प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर संचलित सर्व संस्था आणि शरण फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आयोजित भारतीय ज्ञान परंपरेतील सुवर्ण पर्व :बसवक्रांती याविषयावरील विशेष व्याख्यान आणि महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात वरील सर्व मान्यवर बोलत होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांच्या 81 व्या आणि सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जाहीर अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी दोघांनी संस्था ध्येयनिष्ठेनं चालवली जाईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमात जमलेले श्रोते हे विशेषत्वाने उत्तम कांबळे आणि माजी खासदार जनार्दनजी वाघमारे यांचे विचार ऐकण्यासाठी खूप वेळ ताटकळत बसले होते. अशातच उत्तम कांबळे यांनी मिश्किल पणे आज मी बसवण्याच्या जयंती निमित्त आलो होतो पण त्यासोबतच एक वर दोन फ्री जयंती साजरा करण्याचा योग मला मिळाला असा टोमणा मारला. संपूर्ण कार्यक्रमातून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना प्राधान्याने विचारात घेऊन त्यांच्या नावाला साजेसे काम संस्था चालकांनी करावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी कार्यक्रम अनावश्यक लांबल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/