
लातूर :शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) यांच्या संयुक्त विद्यमाने “भारताच्या व्हिजन 2047 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका :आत्मनिर्भर राष्ट्राच्या दिशेने” या विषयावर ६ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ निर्माण करणार आहे. भारत सरकारच्या ‘व्हिजन 2047’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) महत्त्वाचा वाटा आहे. भारताला डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि देशाच्या स्वयंपूर्णतेला बळकटी देण्यासाठी AI कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, यावर यापरिसंवादात सखोल चर्चा केली जाणार आहे. या राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून AI च्या मदतीने औद्योगिक क्रांती, स्मार्ट शहरे, आधुनिक कृषी प्रणाली, आरोग्यसेवा, शैक्षणिक प्रणाली, स्टार्टअप्स आणि उद्योजकता, तसेच सार्वजनिक धोरण आणि प्रशासनातील सुधारणा कशा साध्य करता येऊ शकतात, यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादाचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणे, तसेच उद्योग, संशोधन आणि विकासाच्या नव्या संधी शोधणे हा आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, धोरणकर्ते, संशोधक, उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि औद्योगिक तज्ज्ञ यांचा सहभाग अपेक्षितआहे.
परिसंवादाच्या मुख्य विषयामध्ये स्मार्ट प्रशासन आणि सार्वजनिक सेवा सुधारणा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शहरी नियोजन, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी AI चे योगदान, औद्योगिक क्रांती 4.0 आणि AI चा आर्थिक वाढीतील वाटा, आरोग्यसेवा क्षेत्रातील AI चे महत्व, शिक्षण व कौशल्य विकासात AI चा प्रभाव, तसेच भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक नेतृत्व कसे मिळवता येईल, यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. तसेच, AI च्या नैतिकबाबी, डेटा गोपनीयता, सुरक्षितता आणि धोरणात्मक बाबींवर ही या परिसंवादात चर्चा केली जाणार आहे. यापरिसंवादासाठी संशोधन निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, निवडक निबंध पिअर-रिव्ह्यूड आणि रेफर्ड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या संशोधनाला व्यासपीठ मिळवावे आणि AI क्षेत्रातील नवीन संशोधनास चालना द्यावी. यामुळे भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नेतृत्व क्षमता वाढेल आणि विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तनाच्या नव्या वाटा खुल्या होतील. या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन मा. डॉ. गोपाळरावजी पाटील, अध्यक्ष, शिव छत्रपती शिक्षण संस्था, लातूर, तसेच मा. डॉ. पी. आर. देशमुख, उपाध्यक्ष, मा. प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मुख्य आयोजक म्हणून प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उप-प्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर आणि डॉ. अभिजीत यादव यांचे विशेष योगदान आहे. तसेच, यापरिसंवादाचे संयोजक डॉ. पुष्पलता त्रिमुखे, विभागप्रमुख तसेच सहसंयोजक डॉ. प्रकाश रोडीया आणि डॉ. व्यंकट धुमाळ यांनी केले आहे. इच्छुक संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी यामध्ये सहभागी होऊन भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भविष्यासाठी मोलाचे योगदान द्यावे असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




