संत सेवालाल महाराज विचार – जीवनकार्याविषयी परिसंवाद
नाशिक:– यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांच्या विचार व जीवनकार्यास परिसंवादातून उजाळा देण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या कल्पनेतून विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाच्या वतीने विद्यापीठात परिसंवाद मालिका सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ‘संत सेवालाल महाराजांच्या कृतीशील विचारांची अध्ययनार्थीसाठी प्रासंगिकता’ या विषयावर विद्यापीठाच्या ‘यशवाणी’ वेब रेडीओवर हा परिसंवाद संपन्न झाला.

विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख व परिसंवादाचे समन्वयक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी ‘साहस शिकवा – संयम शिकवा – उजळू द्या जीवना’ या उक्ती प्रमाणे संत सेवालाल यांनी मानवतेचा विचार मांडला असे सांगितले. तसेच तथागताच्या स्वयंदीप भाव या विचाराचा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचाही अंतर्भावही त्यांच्या विचारात असल्याचे प्रतिपादित केले. प्रा. किशोर राठोड यांनी संत सेवालाल यांचा ज्ञानाचा आणि उद्योगाचा संदेश त्यांच्या दोह्यांद्वारे स्पष्ट केला. दुसरे परिसंवादक डॉ.राजेंद्र बगाटे यांनी आपल्या प्रतिपादनाची मांडणी समाजशास्रीय दृष्टिकोनातून केली. त्यामध्ये ,समता, मानवता, आणि सामाजिक न्याय या संविधानिक विचारांचा ही त्यांनी विशेष ज्ञान जागर केला. तिसरे परिसंवादक डॉ. प्रमोद पवार यांनी या परिसंवादाचे प्रारंभीच विविध अभंगातून उदाहरणे व दाखल्याच्या सहाय्याने आपले विचार व्यक्त केले. चौथे परिसंवादक डॉ. दयाराम पवार यांनी शिक्षण आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरा, मातृभाषेतील शिक्षण, कौशल्य विकास व संत सेवालाल महाराजांचे विचार यातील साम्य अधोरेखित केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यासन प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. अध्ययनार्थी श्रोत्यांना विद्यापीठ संकेतस्थळावर ‘यशवाणी’ शीर्षकांतर्गत कधीही आपल्या सवडीच्या वेळेनुसार श्रवण करता येईल. परिसंवादासाठी तंत्र सहाय्य श्री. प्रकाश सापनर, किरण राऊत, सचिन कटारे यांनी केले.



