लेख / काव्य

भारतीय घुसखोर !!!

भारतीय घुसखोर !!!

हा शब्दच किती अनोळखी आणि अस्विकार्य वाटतो ना? याचं कारण या शब्दातून ध्वनित होणारे तथ्य अस्तित्वात असतानाही यावर आपल्या भोवतीच्या प्रचार आणि प्रसार माध्यमातून मुक्तपणे फारसे भाष्य होत नाही यात आहे. हा शब्द आपल्या कानावर पडत नाही म्हणून तो ओळखीचा वाटत नाही. पण म्हणून आपल्या कानावर नाही याचा अर्थ ती बाब अस्तित्त्वात नाही असं मात्र कधीच नसते. असेलच तर ते आपले अज्ञान असते. किंवा आपण वास्तवापासून अनभिज्ञ असतो.

माध्यमांतून हे तथ्य दडवत राहिल्याने हे वास्तवात हकिकत असलेले तथ्य आपणाला अस्विकार्य वाटते. ही हकिकत प्रचारित होण्या ऐवजी ‘अप्रचारित’ राहिली किंवा ठेवली असल्याचा हा परिणाम.

तर याच्या उलट बांगलादेशी घुसखोर हा शब्द प्रयोग आपल्याला तत्क्षणी स्वीकार्य होतो. तात्काळ बांगलादेश नजरे पुढे येतो आणि तेथून लोकांचे लोंढे भारतात येतात असा संदेश आपल्या मन मस्तकात सहज घुसतो. याला कारण प्रचारात सतत बांगलादेशी खुसखोर हा शब्द वाचलेला नि ऐकलेला असतो. त्या प्रचाराचा स्वतः व्यक्तीवर आणि एकूणच आपल्या समाजमनावर प्रभावी परिणाम झालेला असतो….

भारतीय घुसखोर आणि बांगलादेशी घुसखोर या दोन शब्दात ओळखी- अनोळखीचा जो भाव निर्माण होतो तो माध्यमांच्या अप्रचार आणि प्रचार यातून होतो….

आपण नेहमी प्रचाराच्या परिणामावर बोलत असतो. अप्रचाराच्या परिणामावर कधी बोलत नाही. धूर्त धोरणी मात्र लोकांना गाफील ठेवता यावे आणि वास्तविक स्थितीचे भान येवू नये यासाठी माध्यमातून एखादी हकिकत अप्रचारित कशी राहील म्हणजे एखाद्या तथ्याला अव्यक्त कसे ठेवता येईल, त्याचा बोभाटा कसा होणार नाही याची प्रयत्नपूर्वक काळजी घेत असतात…..

भारतीय घुसखोर हा शब्द आपल्याला आजूनही स्वीकारवत नाही. पण अमेरीकी राष्ट्रपतीच्या कार्यकारी आदेशानंतर अवैधरित्या अमेरिकेत पोचलेले घुसखोर भारतीय पण आहेत आणि ते लाखोच्या संख्येने असल्याची आकडेवारी प्रतिष्ठित भारतीय माध्यमांतून उघडकीस आली आहे.

आपल्या इथे जसे जरासी असहमती झाली की ‘पाठवा त्याला पाकिस्तानात’ असा सर्रास शब्दप्रयोग होतो. तसा आता दोन दिवसापासून deport them outside म्हणजे त्याला देशाबाहेर हाकला असे टाळीचे घोषवाक्य, तकिया कलाम, असा नारा अमेरिकेत लोकप्रिय झालाय. अर्थात हा नारा घोकणारे घोर दक्षिणपंथी आणि ट्रम्प समर्थक आहेत हे ओघाने आलेच.

~~आर एस खनके

Related Articles

One Comment

  1. उत्तर प्रदेशी, बिहारी इत्यादी परप्रांतीय लोकां विषयी राज ठाकरे जे बोलतात तेच ट्रम्प भारत,कॅनडा इत्यादी परदेशीयां विषयी बोलत आहेत या पेक्षाही चिंता जनक बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस करारातुन अमेरिकेचं बाहेर पडणं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/