… ज्ञान दाती तू, ज्ञानज्योती तू
सकल महिलाजणांची तारणहार तू,
अशा कितीतरी अंगाने महिलांच्या जीवनात काळोखातून लख्ख सूर्यप्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला, प्रसंगी अंगावर शेण झेलले, अंगारासारखे शब्द ऐकले, पण बाल विधवांची, पुनर्विवाहाची, जातीभेदांची, सती प्रथेची तू काळ बनून, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील संत तू, सावित्री नव्हे महिलांसाठी रणचंण्डिका तू.
प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठण्यापेक्षा, थेट दोन हात करण्यापेक्षा त्यांच्या अंतर्बाह्य आणि सर्वांगीण बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मार्गांचा अवलंब करत, हजारो वर्षांच्या साखळदंडात जोखडलेली महिला शक्ती असूनही अबला बनलेली नारीशक्ती शिक्षणाच्या माध्यमातूनच मुक्त होऊ शकते, हा विचार घेऊन 1848 चा दिवस उजाडला तो मुलींच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश घेऊनच. 1848 च्या जानेवारीत सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या मदतीने पुण्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. ही खऱ्या अर्थाने भारतीय महिलांच्या जीवनातील सकाळ होती असं आपण म्हणू या. तिथूनच मग सावित्रीआईने महिलांच्या जीवनात अतिशय कष्टप्रद, त्रासदायक अशा सामाजिक रूढी आणि परंपरांची साखळदंड तोडायला सुरुवात केली. त्यामुळे महिला ताकतीनिशी उभं राहण्याचा प्रयत्न करू लागल्या. आज पर्यंतच्या या प्रवासात सावित्रीबाईंनी पेटवलेल्या शिक्षणाच्या होम कुंडात अनेकांनी विचाराच्या, आचाराच्या, संसाराच्या, धर्माच्या आहुती दिल्या.
त्यामुळेच महिलांचे जीवनमान उंचावून समाजात मानाच आणि शक्तीच स्थान प्रस्थापित होऊ शकलं. आज आपण मानवी जीवनातल्या सर्व क्षेत्रात महिलांच्या दैदीप्यमान कारकीर्दीला सहजपणे अनुभवू शकतो. उज्वलपणे त्या पुरुषांसोबत राष्ट्रीय विकासात योगदान देत आहेत. या सर्व गोष्टींचा पाया 1 जानेवारी 1848 साली घातला गेला. त्या थोर माईची आज जयंती. अनेकांनी अनेक पद्धतीने त्यांना आपल्या संस्काररूपी, विचार रुपी, आदरांजली वाहिली. त्याची काही क्षणचित्रे येथे आपणासाठी.
या महान सावित्रीआईला आमचेही शतशत वंदन !









