
अमेरिका इस्राएल आणि इराण या युद्धाला आता दोन आठवडे होतील. या युद्धाचे खरे कारण काय आहे?… यावर अनेक बाजूंनी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. परंतु या युद्धाचे मूलभूत कारण मात्र निराळेच दिसते.
जानेवारी महिन्यात व्हेनेझुएला प्रकरण घडले आणि आठवड्यापासून इराण हा दुसरा अध्याय सुरू झाला. या दोघांमध्ये काही सहसंबंध आहे का? याचा विचार केला असता काही बाबी स्पष्टपणे उघड होतात…
व्हेनेझुएला आणि इराण हे दोघेही तेल उत्पादक देश आहेत आणि ते दोघे गेल्या काही वर्षांपासून चीनच्या जवळ जाऊ लागले होते.
..एकूणच आपल्या परसदारातील चीनची उपस्थिती अमेरिकेला सहन होणे शक्यच नव्हते. त्यामुळे निकोलस मादुरो (व्हेनेझुएला) प्रकरण घडले.
दुसरीकडे इराणमधील चीनच्या वाढत्या भू-राजनैतिक भूमिकेमुळे अमेरिकेचे मध्यपूर्व आणि पश्चिम आशियातील हितसंबंध धोक्यात येतील! हा अमेरिकेला वाटणारा सार्थ नि मोठा धोका होता. त्यामुळे इतर अनेक कारणांबरोबरच चीनची इराणमधील वाढती भूमिका हे या युद्धाचे महत्त्वाचे कारण ठरले.
गेल्या काही वर्षांपासून इराण त्याच्या उत्पादनाच्या जवळपास एक तृतीयांश खनिज तेल चीनला निर्यात करीत होता. ऐन युद्धाच्या काळातही इराणची चीनला दररोज जवळपास एक लाख बॅरल तेलाची निर्यात सुरूच आहे. सोवियत रशियाच्या पतनानंतर आपण जगात एकमेव महासत्ता आहोत हा अमेरिकेचा समज झाला. पण चीन अतिशय वेगाने सर्वच क्षेत्रात पुढे येऊ लागल्याने अमेरिकेसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच आपल्या महासत्ता या पदाला चीन आव्हान बनू नये; यासाठी अमेरिकेचे सुरू असलेले हे प्रयत्न 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांमधील दोन युद्धांचे मुख्य कारण आहे. याच्या जोडीला अमेरिकन संरक्षण उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्यांची अर्थव्यवस्था देखील महत्त्वाचे कारण आहे कारण दररोज भारतीय रुपयात 20 ते 30 हजार कोटी रुपयांचा चुराडा करणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला या युद्धाचा फायदा काय आहे? हा प्रश्न कोणालाही पडेल!
खरे तर या युद्धाचे दुष्परिणाम इराण, इस्रायल, सौदी अरेबियासह जवळपास 15 मध्यपूर्वेतील देशांनाच सहन करावे लागत नसून आता त्याची झळ संपूर्ण जगाला बसू लागली आहे.
जवळपास 77 % अमेरिकन जनता या युद्धाच्या विरोधात गेली आहे. अमेरिकेच्या युरोपातील काही मित्र राष्ट्रांनीही अमेरिकेला मदत करण्यास नकार दिलेला आहे. तरीही अमेरिका आपल्या संहारक शस्त्रांचा मारा करीतच आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून अमेरिकेने साधारण तीन लाख कोटी रुपये या युद्धावर खर्च केले आहेत. पण या युद्धाचा फायदा नेमका कोणाला होतो आहे? ही बाब पाहण्यासारखी आहे.
लॉकहिड मार्टिन ही अमेरिकेची जगातली अग्रगण्य शस्त्र उत्पादक कंपनी असून ती एफ – 35 आणि patriyot क्षेपणास्त्र बनविते. या कंपनीलाच बारा दिवसात 50 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला दुसरी रेथीऑन ही कंपनी एअर डिफेन्स सिस्टीम बनवते. तिला जवळपास एक लाख 25 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आणि आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा बनवणाऱ्या नोर्थ्रोप ग्रुमन कंपनीला पन्नास हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. याच त्या कंपन्या आहेत ज्या निवडणुकीत अमेरिकन राजकीय पक्षांना निधी देतात. म्हणजे जेवढा खर्च अमेरिकेने या युद्धावर दोन आठवड्यात केला.. तेवढाच नफा या कंपन्यांना झालेला दिसतो.
अमेरिकेत शस्त्र उत्पादन करणाऱ्या 60 हजार छोट्या मोठ्या खाजगी कंपन्या आहेत.
या कंपन्यांमध्ये जवळपास 11 लाख 70 हजार तंत्रज्ञ व कामगार आहेत. या कंपन्यांचा एकूण अर्थसंकल्प 8 ते 9 अब्ज रुपयांचा असून जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळपास 30 % इतका मोठा होईल. यापेक्षा अधिक सोप्या भाषेत समजावून घ्यावयाचे असेल, तर या वर्षाचा भारताचा संरक्षण खर्च 7 लाख 86 हजार कोटी रुपये; म्हणजे 93 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा आहे.. तर एकट्या लॉकहिड मार्टिन कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू 7 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 5 लाख 55 कोटी रुपये एवढा आहे.
…या युद्धापासून नेमका फायदा कोणाला होतो आहे, ही बाब बघण्यासारखी आहे. कारण अमेरिका दररोज वीस ते तीस हजार कोटी रुपयांचा चुराडा करीत आहे. अमेरिकेचा हा खर्च त्याच्या शस्त्र उत्पादक कंपन्यांच्या नफ्यातून भागविला जातो आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या एखादा टक्काही नसलेल्या या शस्त्र उत्पादक लॉबीला मिनाब शाळेत दीड – दोनशे अबोध शाळकरी मुली मारल्या जात गेल्या याचा कोणताही विधीनिषेध नाही त्याचवेळी कट्टर इस्लामिक ध्येय जोपासून अणूबाँब हस्तगत करून इस्लामिक जगताचे नेतृत्व करताना स्त्रियांच्या मानवी हक्काचे अतोनात हनन करणाऱ्या इराणमधील कट्टर लोकांनाही याचे किती दुःख झाले असेल? हा देखील संशोधनाचा विषय आहे!
एकंदर दोन्ही बाजूंनी प्राणघातक शस्त्रांचा वापर होऊन त्यांचा खप होतो आहे… मात्र यात मानवता खपते आहे हे मात्र खरे!…

प्रमुख, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभाग.
विद्यावर्धिनी महाविद्यालय,
धुळे 9423979145


