सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक, व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात त्यासाठी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीने 15 मार्चपर्यंत विभागाकडे अर्ज सादर करावेत.
सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहु-फुले-आंबेडकर पारितोषिक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारासाठी अर्ज करीत आहेत, त्या वर्षासाठी विहित केलेल्या अटी व पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुरस्काराच्या पात्रतेचा कालावधी ०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर असा विचारात घेतला जाईल. उदाहरणार्थ, सन २०२४-२५ साठी पात्रतेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ असा राहील. इच्छुक व पात्र स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज १५ मार्च २०२६ पर्यंत संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात सादर करावेत.
लातूर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://sjsa.maharashtra.gov.in तसेच प्रस्तुत कार्यालयाच्या socialjusticelatur.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
समाजसेवी संस्था व व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.



