माझा मऱ्हाठाची बोलू कौतुकें। परि अमृतांतेही पैजा जिंके..

माझा मऱ्हाठाची बोलू कौतुकें।
परि अमृतांतेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
-संत ज्ञानेश्वर
कोणत्याही समाजाचे अस्तित्व, संस्कृती ही त्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या मुख्य आधारावर असणाऱ्या भाषेवर अवलंबून असते. भाषा जेवढी अधिक विकसित होत जाते तेवढी समाज रचना आणि संस्कृती आधुनिक बनत जाते. म्हणून सातत्याने भाषेचे संवर्धन म्हणजे एका संपूर्ण संस्कृतीचे संवर्धन ठरते. ज्या ज्या ठिकाणी भाषेचे संवर्धन झाले नाही अशा अनेक भाषा व संस्कृती आणि त्यांच्या खानाखुणा देखील जगाच्या नकाशावरून नष्ट झाल्या आहेत.
मराठी भाषा ही मराठी भाषकांची सांस्कृतिक ओळख आहे. तिला प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा लाभलेली असून बोलीच्या वैविधतेमुळे तिच्या वैभवात मोठी भरच पडलेली आहे. मराठी भाषेतील पहिला शिलाले कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील असल्याचे मानले जाते. पण मराठी अभ्यासकांत याबाबत एकमत नाही. रायगड जिल्ह्यातील अक्षी येथील शिलालेख याहूनही पूर्वीचा असावा असावा असा एक प्रवाह आहे. पण हे मात्र निश्चित की मराठी भाषेला प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. कोणतीही मातृभाषा ही त्या भाषिक समूहाची सांस्कृतिक ओळख असते. कोणत्याही मातृभाषेवर संकट आले तर त्या समूहाची ओळखच पुसली जाईल. विज्ञान तंत्रज्ञानामुळे आपणास परभाषा अवगत करावी लागत असेल तरी सजगपणे आपण आपली मातृभाषाही जपली पाहिजे
मराठी भाषा ही अत्यंत गोडवा असणारे भाषा मानले जाते तशी ती सुलभ आणि विविध वैशिष्ट्ये आणि युक्त असे आहे त्यामुळे मराठीत स्वतः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी या काव्यग्रंथात मराठी भाषेविषयी हे गौरवोद्गार काढले आहेत. विविध संतांनी, महापुरुषांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगला तिला समृद्ध केले ती भाषा आपण बोलतो त्या भाषेचे आपण पाईक आहोत ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.
आज जागतिकीकरणाच्या काळात ही भाषा जतन करण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी शासन, समाज, भाषेचे अभ्यासक, आणि संशोधक कमी पडत आहेत. परकीय भाषा व संस्कृतीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आपण आपली भाषा व संस्कृती विसरता कामा नये. आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये देखील हा भाषेचा अभिमान आपण रुजवायला हवा. कारण, आपली भाषा व संस्कृती ही आपली ओळख आहे. ही ओळख आपण टिकवून ठेवायला हवी. भारतीय संस्कृतीवर मागच्या अनेक वर्षापासून होत असलेले आक्रमणे आणि त्यातून त्यांच्या कारभारातील भाषेचा मराठीवर पडलेला प्रभाव हा दीर्घकालीन असला, तरी मराठी भाषेने आपला कणा मोडला नाही, ती ताटपणे, समर्थपणे उभी राहून आपला विकास साधत राहिली. परंतु आधुनिकीकरणाच्या कालखंडात आणि जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या संकल्पनांच्या अनुषंगाने ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचा होत असलेला उदो- उदो आणि समाज रचनेच्या उतरंडीमध्ये वैविध्यपूर्ण बोलली जाणारी मराठी ही कुठेतरी दाबली जाते आहे, तिच्या गळा घुसमटतोय. कारण समाजात उच्चभ्रू बनलेला एक वर्ग मराठी ऐवजी इंग्रजी बोलणे किंवा मराठीत हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर करून बोलणे हे आता महानगरीय भाषेचे वैशिष्ट्य बनले आहे. त्यामुळे भाषेचा विकास आणि संवर्धन ही केवळ ग्रामीण भागातील लोकांचेच काम नसून शहरीकरणात जोमाने पुढे गेलेल्या या महानगराने देखील आपल्या भाषेचा गोडवा कायम राखण्यात मदत केली पाहिजे. यावर देखील अनेक वेळेला राजकारण होताना दिसतं ते मराठीच्या विकासासाठी अत्यंत दुर्दैवी ठरणार आहे.
राज्य सरकार मार्फत मराठी भाषेच्या विकासासाठी शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला तरीपण आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण सर्वजण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी खारीचा वाटा म्हणून आपण मराठी बोललं पाहिजे जगलं पाहिजे वागलं पाहिजे आपल्या राहणीमानातून मराठीपणा दिसून आला पाहिजे तरच मराठी समृद्ध होईल विकसित होईल मराठी ज्ञानभाषा देखील होईल. यासाठी साहित्यिकांनी देखील खालावत चाललेला लेखनातील दर्जा वाढवून मराठी भाषेतील साहित्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळतील या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक वाटते.
शासकीय पातळीवरून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, लेखक यांचे सन्मान तर वेळोवेळी केले जातातच पण त्याबरोबरच शैक्षणिक पातळीवर देखील मराठीचे महत्त्व वाढावे यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शैक्षणिक पातळीवर मराठीचा समावेश अनिवार्य करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न झाले पाहिजेत. शिवाय इतर भाषेतील लोकांना मराठी भाषेचा सहजपणे अभ्यास करता यावा अशा काही मुक्त अभ्यासक्रमांची रचना देखील वेगवेगळ्या विद्यापीठात होणे आवश्यक वाटते. त्यासाठीचे मोबाईल ॲप्स, संगणक आधारित प्रोग्रॅम्स विकसित करणे आणि त्यांचा प्रसार प्रचार करणे हे देखील गरजेचे आहे.
सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!




💐