Special Story

सावधान ! ह्युमन ट्रॅफिकींगचे जाळे विस्तारत आहे

आपल्या आजूबाजूला, आसपास सातत्याने एका गोष्टीवर चर्चा होते, ती म्हणजे मुले पळवणारी टोळी. हे केवळ लहान मुलांच्याच बाबतीत घडतेय असे नव्हे तर अलीकडे सर्वच वयोगटातील लोकांच्या बाबतीत असे घडत आहे. जगातील जवळपास पाच कोटी लोक दरवर्षी मानवी तस्करीला बळी पडतात. ही सर्वच देशात भेडसावणारी मोठी समस्या बनली असून ह्युमन ट्रॅफिकींग प्रकार अलीकडे वाढले आहेत.

कमी कालावधीत जास्त पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी मानवी वृत्ती कोणत्या थराला पोहोचत आहेत. त्यातून अनेक वाईट प्रकार घडत असून नैतिक, अनैतिक अशा कोणत्याही प्रकारे मानवाला धोका निर्माण होईल अशा कृती केल्या जात आहेत. त्यात अलीकडच्या कालखंडात ग्रामीण पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गंभीर बनत चाललेली समस्या म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग. ह्यूमन ट्रॅफिकिंग ही वेगवेगळ्या कारणांसाठी होत असते. तिचे उद्देश प्रत्येक वेळेला वेगळे दिसून आलेले आहेत. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये आपण अडकणार नाहीत आपल्या परिवारातील अबोध बालके, मुली अडकणार नाहीत याची दक्षता घेणेच महत्त्वाचे ठरणार आहे. ह्यूमन ट्रॅफिकींगच्या संदर्भात सहसा परिसरात खेळणारी लहान मुले, शाळेतून घरी येताना रेंगाळणारी मुले, दूरच्या कॉलनीमध्ये राहणारे, मित्रांच्या घराकडून जाताना येतानाची मुले, एकलकोंडी किंवा ज्यांच्यावर अचानक संकटे कोसळली आहेत अशी, रागाच्या भरात घर सोडणारी महिला, मुली, ज्यांना समाजातून, कुटुंबातील लोकांकडून खूपच वाईट वागणूक मिळत असेल किंवा आहे त्या स्थितीतून अवनातीच्या मार्गाकडे लागलेले लोक याला अधिक बळी पडतात.
भूलथापा, विश्वासघात, जबरदस्तीने, प्रेमाची, पैशाची किंवा अन्य गोष्टींची लालूच अशा माध्यमातून मानवी तस्करी घडत असते. मानवी तस्करीतील व्यक्तींना शारीरिक, मानसिक प्रकारचे त्रास तर होतातच पण त्याचबरोबर मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. ज्यांची तस्करी केली जाते त्यांच्याकडून भिक मागणे, चोरी व अन्य वाईट कामे करून घेण्यापासून ते त्यांच्या शरीरातील अवयवांच्या विक्रीपर्यंतचे सर्व बेकायदेशीर कामे करून घेतली जातात.
सामान्यपणे मानवी तस्करांकडून जे विविध प्रकारचे शोषण केले जाते त्यात
१. लैंगिक तस्करी: हे मानवी तस्करीच्या सर्वात महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे, जिथे अल्पवयीन मुली व महिलांना वेश्याव्यवसाय किंवा लैंगिक शोषण करण्यास भाग पाडले जाते. हा प्रकार भारतातच नव्हे तर जगातील सर्वाधिक ह्यूमन ट्रॅफिकिंग मधील मुख्य कारण मानले जाते
२. कामगार तस्करी: पीडितांना शेती, बांधकाम आणि घरगुती कामासह विविध क्षेत्रांमध्ये जबरदस्तीने कामावर लावले जाते, अनेकदा कठोर परिस्थितीत आणि कमी पगारात काम करावे लागते. भूलथापांना बळी पडून अशा तस्करांसोबत जर एखादी लहान मुले मुली पळून गेल्या तर त्यांना विदेशात विकले जाते.
३. बाल तस्करी: मुले विशेषतः असुरक्षित असतात आणि बहुतेकदा त्यांना श्रम, लैंगिक शोषण किंवा दत्तक घेण्यासाठी किंवा त्यांच्या किडनी लिव्हर किंवा अन्य अवयवांसाठी त्यांचा वापर केला जातो.
अनेक वेळेला प्रेमाचे आमिष दाखवत आंतरजातीय विवाह करून, आंतरधर्मीय विवाह करून अशा अवस्थेत घराबाहेर न पडू शकणाऱ्या महिलांना खूपच सामाजिक आणि शारीरिक परिणामाला तोंड द्यावे लागते. कधी कधी अशा महिलांची इतर देखील विक्री केली जाते.
मानवी तस्करांकडून हेरून विविध अमिष दाखवून जाळ्यात ओढण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले जातात. बरेच पैसे देखील खर्च केले. जातात विश्वास संपादन केला जातो. प्रेमाचे नाटक केले जाते. आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा विश्वास संपुष्टात आणला जातो आणि केवळ मी आणि मीच विश्वासू असल्याची भावना मनात निर्माण केली जाते. म्हणूनच 15 ते 18 वयोगटातील मुलींचे प्रमाण अशा प्रकारच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणून आपली मुलं मुली आपल्यापासून आपल्या विश्वासापासून लांब जात नाहीत ना याची काळजी घेतली नाही तर कदाचित अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या बाबतीत देखील घडू शकतात. या संदर्भात बाहेर येणारी आकडेवारी चिंतित करणारी आहे. कायदे कितीही कडक असले तरी एकदा शारीरिक शोषण झाल्यानंतर आपण त्याची भरपाई कशानेही करू शकत नाही.
बेवारस स्थितीत फिरणाऱ्या लहान मुलांना आपल्याकडे ठेवून त्याचे संगोपन केल्याचे दाखवून त्याच्या नावाने कोटी दोन कोटीचा विमा उतरून त्याच्याशी घातपात करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना मुलींना या सर्व गोष्टींची कल्पना देऊन त्याबाबतीत त्यांचे ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. त्यांना आपली भीती न वाटता केलेल्या चुका आई-वडिलांशी, भावंडाशी शेअर करण्यासंदर्भात त्यांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे . जेणेकरून आपल्या परिवारातील कोणताही सदस्य ह्यूमन ट्रॅफिकच्या संदर्भात बळी पडणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/