FLash

डाॅ बामुचा उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ.रामकृष्ण हरिदास कदम यांना जाहीर

विद्यापीठ वर्धापन दिनी पुरस्कार वितरण

छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने वर्धापन दिनी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी या पाच पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयात उत्कृष्ट कार्य करणा-या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विद्यापीठ वर्धापनादिनी पुरस्कार प्रदान करण्याबाबत गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी झालेल्या अधिसभा बैठकीतील ठरावनुसार यंदापासून सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे तीन पुरस्कार देण्यात येतील. तसेच विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसर येथील शैक्षणिक विभागातील नियमित प्राध्यापक, प्रशासकीय विभागातील नियमित शिक्षकेत्तर कर्मचारी अशा दोघांची निवड व वितरण करण्यात येणार आहे.मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पुरस्कारांची नियमावली ठरविण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या काळात उत्कृष्ट कार्य करणा-या मधून आवेदन मागविण्यात आले. जुलै अखेपर्यंत पाच पुरस्कारांसाठी दाखल झालेल्या २२ अर्जांची छानणी करुन शिफारस करण्यासाठी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी समिती गठीत केली. अन्य विद्यापीठातील प्रकुलगुरु हे समितीचे अध्यक्ष होते. विभागाचे तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बाहेरील अनुभवी व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांचा समावेश होता. या समितीने पाच नावांची शिफारस केली.

पाच जणांना पुरस्कार जाहीर

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कर्मचारी, शिक्षक प्रत्येकी दोन व एक प्राचार्य असे एकुण पाच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाच्या पुरस्कारार्थीमध्ये उत्कृष्ट प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ – यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, उत्कृष्ट महाविद्यालय शिक्षक डॉ.रामकृष्ण हरिदास कदम – श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी (ता.उमरगा, जि.धाराशिव), महाविद्यालयीन कर्मचारी डॉ.दर्शना गांधी – जोशी – देवगिरी महाविद्यालय, विद्यापीठ शिक्षक – डॉ.मच्छिद्र लांडे- रसायनशास्त्र विभाग व विद्यापीठ कर्मचारी डॉ.अनिता पाटील, सहायक कुलसचिव, शैक्षणिक विभाग यांचा समावेश आहे. या सर्वांना विद्यापीठ वर्धापन दिनी येत्या रविवारी (दि.२३) प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा सकाळी १० वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होईल. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यस्थान भूषविणार आहेत. यावेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी भास्कर शंकरराव मुंढे यांना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करणार येणार आहे. कार्यक्रमास प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/